व्यसन किती धोकादायक आहे याचीही त्यांनी विस्तृत समज दिली आहे. योग्य समजच व्यसनाबद्दलचा दृष्टिकोन बदलते आणि एक दिवस त्या व्यक्तीला व्यसनातून मुक्त करूनच सोडते.
या पुस्तकात दादाश्रींनी व्यसनमुक्त होण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक उपाय म्हणजे चार टप्प्यांची अनोखी पद्धत:
- व्यसन चुकीचे आहे असा दृढ निश्चय करणे.
- ते कोणत्या प्रकारे चुकीचे आहे याची समज गोळा करून ती जागृतीत ठेवणे.
- निश्चय केल्यानंतर जितक्या वेळा पुन्हा व्यसन होते, तितक्या वेळा प्रतिक्रमण-प्रत्याख्यान करणे.
- कोणी त्यासाठी चूक काढली, अपमान केला, तरीही त्या व्यसनाचे समर्थन किंवा संरक्षण न करणे.
ज्याला स्वतःला व्यसन आहे, त्याच्यासाठी या पुस्तकातून अनेक उपयुक्त किल्ल्या मिळतीलच; पण त्याचबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये कोणाला व्यसन असेल, तर त्यांच्याशी कोणत्या समजुतीने वागावे याबद्दल दादाश्रींनी दिलेली समजही एक नवा दृष्टिकोन देईल.
यामुळे स्वतःच्या मनात राग-द्वेष निर्माण होणार नाही आणि समोरच्या व्यक्तीलाही व्यसनातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक प्रेरणा व योग्य दिशा मिळेल.